पुण्यात कल्याणीनगर इथे झाल्येल्या पोर्शे अपघात प्रकरणानंतर पुणे महानगर पालिकेला जाग आली असून ती ऍक्शन मोड मध्ये आली आहे.आज सकाळी पुण्याच्या उच्चभ्रू परिसरातल्या कोरेगाव पार्क येथील वॉटर आणि ओरिला या दोन्ही पबवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यात कल्याणी नगर येथे अपघाताचे प्रकरण हे चांगलेच तापले आहे. बिल्डरच्या अल्पवयीन मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत असताना झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा हकनाक बळी गेला आहे. यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाशी संबधित कॉझी अँड ब्लॅकवर कारवाई करत हॉटेलच्या मॅनेजरला आणि मालकावर गुन्हा दाखल अटक केली होती. दरम्यान, आज पुणे महानगर पालिकेने पुण्यातील बारवर कारवाईच्या बडगा उगारला आहे.
नियम न पाळल्याने पालिकेकडून शहरात नियमबाह्य पद्धतीने बार आणि पबवर चालवण्यात येत असलेल्या सर्व पब आणि बारला नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. आज सकाळी कोरेगाव पार्क येथील वॉटर्स आणि ओरिला या दोन बड्या पबवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. हे दोन्ही पब पुण्यातील प्रसिद्ध पब आहेत. या पबमध्ये शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी पाहायला मिळते. रात्री उशिरा पर्यंत हे पब सुरू असतात. हे पब अनधिकृत पणे सुरू असल्याची माहिती यापूर्वी अनेकदा समोर आली होती मात्र, कारवाई होत नव्हती.
आज अखेरीस या दोन्ही पबवर कारवाई करत अतिक्रमण पाडण्यात आले आहे. पुण्यातल्या तथाकथित उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कल्याणीनगर, कोरेगाव पार्क ,विमान नगर या परिसरात हे पब्ज अनधिकृत पद्धतीने चालू असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे.
या भागातील पब आणि रेस्टॉरंट्सच्या वाढत्या प्रमाणाने रहिवाशांच्याही चिंता वाढल्या आहेत . ठरलेल्या वेळेत हे पब बंद ना होणे, अनधिकृत पद्धतीने पार्किंग केले जाणे,या मद्यधुंद अवस्थेत आणि रॅश गाडी चालवणारे तरुण , विचित्र पद्धतीने होणारा हॉर्नचा वापर, तरुणांचे उध्दट वर्तन, हिंसाचार अश्या अनेक समस्या समोर येताना दिसत आहेत. यासाठी अश्या पब्ज आणि क्लबवर वेळेत कारवाई होणे आणि त्याबाबत भविष्यातही नियमितता पाळली जाणे अत्यावश्यक बनले आहे.