Amruta Fadnavis On Pune Porsche Accident : सध्या पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातामुळे सगळीकडे संतापाचं वातावरण आहे. एका प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोनजणांना मागून जोरात धडक दिली. या अपघातात एका तरूणाचा आणि तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर अल्पवयीन मुलाला अवघ्या पाच तासांमध्ये काही अटी शर्तींसह जामीन मिळाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावर या प्रकरणाने जोर धरताच पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडीलांना अटक केली आहे. तसेच आता पोलिसांनी अल्पवयीन मुलावर आणि त्याच्या वडिलांवर नव्याने गुन्हा दाखल केला असून आज त्या दोघांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
या अपघात प्रकरणावर अनेकांनी संताप व्यक्त केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “पुण्यात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. मात्र, या प्रकरणातील प्रमुख आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी. तसेच आरोपीला बाल न्याय मंडळानं दिलेला जामीन हा लाजीरवाणा निकाल आहे”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
दरम्यान, या प्रकरणी अल्पवयीन मुलावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यावर बाल न्याय मंडळासमोर सध्या सुनावणी सुरू आहे.