Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या मोठ्या अपघातामुळे सगळीकडे संतापाचं वातावरण आहे. प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल याने पोर्शे कारने दोनजणांना मागून जोरात धडक दिली. या अपघातात एका तरूणाचा आणि तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर अल्पवयीन मुलाला अवघ्या पाच तासांमध्ये काही अटी शर्तींसह जामीन मिळाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाने सोशल मीडियावर जोर धरताच पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडीलांना छ. संभाजीनगरमधून अटक केली आहे. तसेच आता पोलिसांनी अल्पवयीन मुलावर आणि त्याच्या वडिलांवर नव्याने गुन्हा दाखल केला असून आज त्या दोघांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती सकाळी मिळाली होती. तर आता विशाल अग्रवालला पुणे कोर्टात दाखल करण्यात आलं आहे.
यावेळी पुणेकरांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळालं. कोर्ट परिसरामध्ये पोहोचताच विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवरती शाई फेकली. पण, यावेळी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावला.
वंदे मातरम या संघटनेनं हे काम केलं आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्याबाहेर काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना रोखलं. तर या प्रकरणी पोलिसांनी वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
यावेळी अपघातासाठी विशाल अग्रवाल हा त्याच्या मुलापेक्षा अधिक जबाबदार आहे. त्यामुळे आम्ही त्याला धडा शिकवण्यासाठी येथे आलो आहोत, असे वंद मातरम संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले. तसेच पुण्यातील पबवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचा परवाना रद्द झाला पाहिजे. सोबतच विशाल अग्रवालवर मोकातंर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे.