घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. दरम्यान गुन्हे शाखेच्या कक्ष सहाचे प्रभारी निरीक्षक महेश तावडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या बेमोसमी पाऊस आणि प्रचंड वादळी वाऱ्यांमुळे १३ मे रोजी घाटकोपरमधील महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. त्याखाली अडकून अनेक वाहने दबली.
आता पांच दिवसांनंतर त्यातील मृतांचा आकडा १७, तर जखमींची संख्या ७३ आहे. दरम्यान या दुर्घटनेची राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनासह पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर आता तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून गुन्हे शाखेच्या कक्ष सहाचे प्रभारी निरीक्षक महेश तावडे या पथकाचे नेतृत्व करणार आहेत. पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.
ज्या कंपनीने हे होर्डिंग लावले होते त्याचा मालक भावेश भिंडे याच्या कार्यालयातून कागदपत्रं जप्त करण्यात आली असून त्यानुसार तपास केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भावेश भिंडे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकी काय घडली घटना?
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर १२० बाय १२० चौरस फुटांचं महाकाय होर्डिंग लावण्यात आले होते. हे होर्डिंग्ज नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आले होते. त्यात अचानक आलेला पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महाकाय होर्डिंग बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर पडले. त्यात निष्कारण लोकांचा मृत्यू झाला. पेट्रोल पंप असल्याने तिथे बचावकार्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे तब्बल ४८ हून अधिक तास बचावकार्य सुरू होते.