Pawan Singh : सध्या देशात लोकसभा निवडणूक 2024 सुरू आहे. आत्तापर्यंत पाच टप्प्यातील निवडणुका झाल्या पूर्ण झाल्या आहेत. अशातच आता भाजपने भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची बातमी समोर येत आहे. तसेच पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन सिंह करकट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि येथून ते एनडीए समर्थित उपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात उभे आहेत. याच कारणावरून भाजपने त्यांच्यावर ही मोठी कारवाई केल्याचे मानले जात आहे.
सध्या बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी एक आदेश जारी केला असून पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. पक्षाने जारी केलेल्या पत्रात पवन सिंह लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
पवन सिंह यांची ही कृती पक्षविरोधी असून, त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली असून तुम्ही पक्षशिस्तीच्या विरोधात हे कृत्य केले आहे. त्यामुळे या पक्षविरोधी कृत्याबद्दल प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावरून तुमची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, असे जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.