PM Modi On Akhilesh Yadav : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक राज्यात जाऊन भव्य सभा घेत आहेत. तर यावेळी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
पंतप्रधान मोदींनी अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर श्रावस्तीमध्ये हल्ला चढवला आणि म्हणाले की, “सपा-काँग्रेसने त्यांच्या रॅलीसाठी लोकांना पैसे देऊन आमंत्रित केले होते. मात्र, पेमेंट न मिळाल्याने लोकांनी स्टेजवर चढून गोंधळ घालण्यास सुरुवात केली”, अशी टीका मोदींनी केली.
गेल्या काही दिवसांपासून अखिलेश यादव यांच्या सभेत सतत गोंधळ सुरू आहे. लोक बॅरिकेड्स तोडून स्टेजवर पोहोचत आहेत. अलाहाबादच्या फुलपूरमध्ये, संत कबीरनगर आणि आझमगढच्या लालगंजमध्ये मंगळवारी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. फुलपूरमध्ये माईक तुटल्यामुळे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना भाषणही करता आले नाही.
यासंदर्भात पीएम मोदी म्हणाले की, “काल मी एक व्हिडिओ पाहिला होता. जाहीर सभेला पोहोचलेले लोक स्टेजवरच चढत होते. मी विचारले की हे का होत आहे. सपा-काँग्रेसचे सदस्य लोकांना जाहीर सभांना आणण्यासाठी पैसे देतात, असे समोर आले. या लोकांनी पैसे न दिल्याने ते स्टेजवरच संतापले. त्यामुळे अशा पक्षाची ही स्थिती आहे तो तुमचा काय फायदा करू शकेल?”
“सध्या दोन मुलांची जोडी पुन्हा आली आहे. जुना फ्लॉप चित्रपट पुन्हा लाँच झाला आहे. मोदींनी तुमचे बँक खाते उघडले, तुम्हाला वीज कनेक्शन दिले, नळ बसवले. पण हे लोक आले तर तुमचे बँक खाते हिसकावून पैसे घेऊन जातील. ते तुमचे वीज कनेक्शन तोडून अंधार निर्माण करतील. तुमच्या घराचा पाण्याचा नळही उघडून ते घेऊन जातील”, अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली.