बांगलादेशच्या सत्ताधारी पक्षाचे खासदार अन्वारुल अझीम, जे 18 मे रोजी बेपत्ता झाले होते, ते कोलकाता येथे आज मृतावस्थेत आढळून आले आहेत.
बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी ढाका येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, कोलकाता येथे अझीम यांची हत्या झाली आहे. आज आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की, बांगलादेश पोलिसांनी या संदर्भात तीन जणांना अटक केली आहे तसेच हे सर्व मारेकरी बांगलादेशी आहेत. ही नियोजित हत्या असल्याचे बांगलादेशचे गृहमंत्री म्हणाले आहेत,
12 मे रोजी भारतात प्रवेश केलेले बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम हे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचे कौटुंबिक मित्र गोपाल बिस्वास यांना त्यांच्या कोलकाता येथील घरी भेटण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी 1.41 वाजता डॉक्टरांना भेटण्याचे सांगून ते तेथून निघून गेले.
संध्याकाळी परत येईल असे सांगितले. अन्वारुल यांनी बिधान पार्कमधील कलकत्ता पब्लिक स्कूलसमोरून टॅक्सी पकडली. संध्याकाळी त्यांनी गोपाल यांना व्हॉट्सॲप मेसेज पाठवून आपण दिल्लीला जात असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांचे ठिकाण कळू शकले नाही. कोलकात्यातील विधाननगरमधील एका कौटुंबिक मित्राच्या म्हणण्यानुसार,त्यांनी आपण दिल्लीला जाणार असल्याचे नमूद केले, परंतु 13 मे पासून त्यांच्याशी थेट संपर्क झालेला नाही.
कोलकाता पोलिसांनी अझीम यांच्या मित्राच्या घराची झडती सुरू केली आहे. तसेच तिथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. त्या फ्लॅटवर वारंवार ये-जा करणाऱ्या लोकांची ओळख शोधण्याचाही ते प्रयत्न करत आहेत. बांगलादेशी दूतावासही पोलिसांच्या सतत संपर्कात आहे. बांगलादेश सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.