Jairam Ramesh : लोकसभा निवडणुकीचे आत्तापर्यंत पाच टप्पे पार पडले आहेत, आता अखेरचे दोन टक्के शिल्लक आहेत. तर येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर जर विरोधा पक्षांना बहुमत मिळाले तर त्यांच्याकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार? किंवा राहुल गांधी पंतप्रधान होणार का? याबाबत काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांना प्रश्न विचारण्यात आला. तर यावर ही व्यक्तींमधील सौंदर्य स्पर्धा नाही, असं जयराम रमेश यांनी उत्तर दिले.
यावेळी जयराम रमेश म्हणाले की, 13 मे 2004 रोजी काँग्रेस आणि घटक पक्षांना बहुमत मिळालं होतं. तर 17 मे म्हणजेच चार दिवसांनंतर डॉ. मनमोहन सिंह यांचे नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी नाव जाहीर करायला फक्त चार दिवस लागले होते तर यावेळेस चार दिवस पण लागणार नाहीत. आम्ही दोन दिवसांमध्ये नाव जाहीर करू.
आपल्या देशामध्ये ही व्यक्तींमधील सौंदर्य स्पर्धा नाही. तसेच आम्ही पक्ष आधारित लोकशाही आहोत त्यामुळे कोणत्या आघाडीला किंवा पक्षाला जनादेश मिळेल हा प्रश्न आहे. व्यक्तीला इतकं महत्त्व नसेल. पक्षांना बहुमत मिळालं की पक्ष आपला नेता निवडतो आणि तोच नेता पंतप्रधान होतो, असं जयराम रमेश म्हणाले.
ही एक प्रक्रिया असते, त्याप्रमाणे खासदार एकमेकांना भेटतील आणि ते पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडतील. शॉर्टकटवर आम्ही विश्वास ठेवत नाही. आम्ही अहंकारवादी नसून आमच्या इंडिया आघाडीचे आकडे येतील आणि मग सर्व पक्षांचे आकडे आल्यानंतर स्पष्ट जनादेश येईल, असेही जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.