Swati Maliwal : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर त्यांचे सहकारी बिभव कुमार यांनी केलेल्या कथित हल्ल्याची निष्पक्ष चौकशी हवी आहे, असे म्हटले आहे. तर आता स्वाती मालीवाल यांनी या संपूर्ण प्रकरणावर पुन्हा एकदा ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
स्वाती मालीवाल यांनी 13 मे रोजी मुख्यमंत्री निवासस्थानी बिभव कुमार यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी बिभव कुमार सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर आता स्वाती मालीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘मुख्यमंत्री साहेब’ असे संबोधले आहे.
स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “मी तक्रार दाखल करताच माझ्यामागे नेते आणि स्वयंसेवकांची संपूर्ण फौज तैनात करण्यात आली, मला भाजपचा एजंट संबोधण्यात आले, माझ्या चारित्र्याची बदनामी करण्यात आली, माझ्या मारहाणीचा व्हिडीओ लिक करण्यात आला, आरोपींसोबत हिंडले, पुन्हा गुन्ह्याच्या ठिकाणी येऊ दिले आणि पुराव्यात छिद्र पडले, ते स्वत:च आरोपीसाठी रस्त्यावर उतरले आणि आता ज्यांच्या ड्रॉईंगरूममध्ये मला मारहाण झाली ते मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत की, या प्रकरणात आरोपीचा कोणताही सहभाग नसून निष्पक्ष चौकशीची गरज आहे. “
“यापेक्षा मोठी विडंबना काय असू शकते? माझा विश्वास बसत नाही. शब्द आणि कृती सारखीच असली पाहिजे”, असंही स्वाती मालीवाल म्हणाल्या.