काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील यांची मृत्यूशी आज झुंज अपयशी ठरली आहे. आज पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. . गांधी घराण्याच्या विश्वासू आणि स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पी.एन. पाटील यांना ओळखले जात असे.
पी. एन. पाटील यांच्यावर रविवारी सकाळी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तसंच त्यांना आदरांजलीही वाहिली आहे.
कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आमदार पी. एन. पाटील यांनी करवीर मतदारसंघासह जिल्ह्यात जोरदार प्रचार केला होता. कोल्हापूर लोकसभेला सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले होते. आधी लोकसभा निवडणुकीसाठी पी. एन. पाटील यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, वय आणि प्रकृती लक्षात घेत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.
दरम्यान, जिल्हा काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज आमदार पी. एन. पाटील यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुळ गावी सडोली खालसामध्ये नेण्यात येणार आहे. सडोली खालसामध्येच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.