Pravara River : अहमदनगर जिल्यातील अकोले तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी (22 मे) अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी दोन तरूण गेले होते. त्यावेळी या दोन्ही तरूणांचा बुडून मृत्यू झाला. अर्जुन रामदास जेडगुले (वय 18) आणि सागर पोपट जेडगुले (वय 25) अशी मृत युवकांची नावे आहेत. तर या मुलांच्या शोधासाठी SDRF चे जवान आज (23 मे) सकाळी पोहोचले होते. तर या शोधादरम्यान जवानांटी बोट उलटली आणि या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे.
प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरूणांचा शोध एसडीआरएफचे जवान घेत होते. यावेळी धरणातून पाणी सोडलं असल्यामुळे नदीच्या प्रवाहात पाण्याचा वेग प्रचंड होता. त्यामुळे जवानांची बोट उलटली आणि यामध्ये तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या जवानांचे मृतदेह मिळाले असून दोघांचा शोध सुरू आहे.
तरूणांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या बोटीमध्ये चार जवान आणि एक स्थानिक नागरिक होता. तर जे जवान वाचवण्यासाठी आले होते त्यांचाच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तातडीनं घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी प्रशासनाला याबाबत सूचना केल्या आहेत.