Dombivli MIDC Blast : डोंबिवलीमध्ये एक मोठी घटना घडली आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात आज (23 मे) दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीमधील बॉयलरमध्ये ब्लास्ट झाला आहे. हा ब्लास्ट एवढा भीषण होता की सर्वत्र धुरांचे लोट पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील अंबर केमिकल कंपनीमधील बॉयलरमध्ये हा स्फोट झाला आहे. हा स्फोट झाल्यानंतर डोंबिवली परिसरात अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. तसेच या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा देखील फुटल्या आहेत. तर आता या स्फोटात किती जीवितहानी झालेली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. तर या आगीत 6 ते 7 कामगार गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी अजूनही स्फोट सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.