Swati Maliwal : आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी 13 मे रोजी अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्याशी झालेल्या चकमकीची आठवण करून दिली आणि त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते असा आरोप केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
स्वाती मालीवाल यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी 13 मे रोजी सकाळी 9 वाजता केजरीवाल यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी मला ड्रॉईंग रुममध्ये बसवले आणि सांगितले की केजरीवाल मला भेटायला येतील. तेवढ्यात तिथे बिभव रुममध्ये आला आणि मी त्याला सांगितले की अरविंदजी मला भेटायला येत आहेत, काय हरकत आहे. मी असे बोलले आणि त्याने मला मारायला सुरुवात केली.
बिभवने मला मारहाण केली आणि त्यावेळी मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझे पाय धरले आणि मला जमिनीवर ओढले. माझे डोके सेंटर टेबलवर आदळले. मी जमिनीवर पडताच त्याने मला लाथ मारायला सुरुवात केली. मी मदतीसाठी आरडाओरडा केला पण कोणीच आले नाही, असा धक्कादायक खुलासा स्वाती मालीवाल यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, मी त्यांना सांगितले की मला मासिक पाळी येत आहे, पण तरीही त्यांनी माझे ऐकले नाही आणि मला मारत राहिले. तसेच तिने पोलिसांना फोन केला तेव्हा बिभवने तिला जे हवे ते करा असे सांगितले, असा खुलासाही मालीवाल यांनी केला आहे.