आयपीएलच्या क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहली दमदार कामगिरी करत आहे, पण त्याला आणि त्याच्या आरसीबी संघाला अद्यापही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाहीये. यंदाही IPL 2024 मध्ये विराट कोहलीचा संघ आरसीबी एलिमिनेटरमध्ये पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला आहे आणि या पराभवामुळे RCB ची ट्रॉफीसाठी 17 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणखी लांबली आहे.
विराट कोहली हा वयाच्या 35 व्या वर्षी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर 8004 धावा आहेत, ज्या त्याने 38.66 च्या सरासरीने आणि 131.97 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. कोहलीच्या या चमकदार कामगिरीनंतरही त्याच्या संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचा आनंद अद्यापही मिळालेला नाही. तर या पराभवाबाबत अनुभवी इंग्लिश क्रिकेटपटू केविन पीटरसनने आपले मत व्यक्त केले आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना केविन पीटरसन म्हणाला, मी हे आधीही बोललो होतो आणि आता पुन्हा सांगतो इतर खेळांमध्येही महान खेळाडूंनी चॅम्पियन बनण्यासाठी त्यांचे संघ बदलले आहेत. कोहलीने किती मेहनत घेतली हे सर्वांनाच माहीत आहे. त्याने पुन्हा ऑरेंज कॅप जिंकली, शानदार फलंदाजी केली, तरीही संघाचा पराभव झाला. तो आरसीबीच्या ब्रँडसाठी आणि त्याच्या व्यावसायिक मूल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे मला समजते. पण विराट कोहली ट्रॉफीला पात्र आहे. तो अशा संघात खेळण्यास पात्र आहे जो त्याला चॅम्पियन बनण्यास मदत करेल.
मला वाटते की विराट कोहलीने यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, पीटरसनने कोहलीला आरसीबीमधून दिल्ली कॅपिटल्समध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. “मला वाटते की दिल्ली कॅपिटल्स ही विराटसाठी योग्य जागा असू शकते. तिथे गेल्यानंतर तो बहुतेक वेळा त्याच्या घरी राहू शकतो. मला माहित आहे की दिल्लीत त्याचे स्वतःचे घर आहे आणि त्याचे एक लहान कुटुंब देखील आहे. अशा प्रकारे तो आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवू शकेल.तो मूळचा दिल्लीचा. मग तो पुनरागमन का करू शकत नाही? बंगळुरूप्रमाणेच दिल्लीही ट्रॉफीसाठी आतुर आहे”, असंही पीटरसन म्हणाला.