डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे. दुसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून शोधकार्य सुरु आहे. या घटनेत ६० हून अधिक जण जखमी असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या शोधकार्यादरम्यान शुक्रवारी सकाळी उद्ध्वस्त अवशेषांमध्ये आणखी तीन मृतदेह सापडले आहेत. यापैकी एक मृतदेह केजी केमिकल्स कंपनीच्या आवारात आढळला आहे. अग्निशमन दलाने हे मृतदेह एनडीआरएफच्या ताब्यात दिले असून ते आता रुग्णालयात पाठवले जाणार आहेत. त्यामुळे आता मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे.
अमुदान कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली होती. मात्र, या बॉयलरसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच या कंपनीत कोणतीही परवानगी घेतलेला अधिकृत बॉयलर नव्हता, अशी माहिती चौकशीदरम्यान पुढे आली आहे. आता यानंतर पोलिसांनी कंपनीचे मालक प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
एमआयडीसीमधील अमुदान कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाचे हादरे दोन ते किलोमीटरच्या परिसरात बसले होते. त्यामुळे या परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. बॉयलरचे तुकडे दीड किलोमीटर लांबच्या अंतरावर फेकले केले होते. आजूबाजूच्या परिसरात धूर पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.