Spain Restaurant Roof Collapse : स्पेनमध्ये नुकतीच एक मोठी दुर्घटना घडली आहे. स्पेनमधील एका बेटावरील समुद्रकिनारी असलेले रेस्टॉरंट अर्धवट कोसळले आहे. या अपघातात सुमारे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहे. तर अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना स्पेनच्या माजोर्का बेटावर घडली आहे. येथील बीचवर असलेल्या रेस्टॉरंटचे बहुतांश छत पडले आहे. मेडुसा बीच क्लब हे तीन मजली रेस्टॉरंट असल्याचे सांगितले जात आहे. माजोर्काच्या आपत्कालीन सेवा विभागाने सांगितले की, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 27 जण जखमी झाले आहेत.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी X वरील एका पोस्टमध्ये या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच बचाव कार्यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच पंतप्रधानांनी राष्ट्रीय सरकारची सर्व संसाधने स्थानिक आणि प्रादेशिक नेत्यांना देऊ केली आहेत.
आपत्कालीन सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक अडकले असण्याची भीती बचाव पथकाने व्यक्त केली आहे. त्यामुळे जखमी आणि मृतांचा आकडा अजून वाढू शकण्याची शक्यता आहे.