सध्या देशातील वातावरणात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. मान्सून देखील अंदमानात दाखल झाला आहे. काही दिवसांत तो केरळ आणि मग महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मात्र देशातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे तर, अनेक ठिकाण उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसताना पाहायला मिळत आहे. दिल्ली,राजस्थानसह अनेक ठिकाणी नागरिकांना सकाळपासूनच कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण भारत सध्या कडक उन्हाचा सामना करत आहे. याच मोसमात अनेक राज्यांतील तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत, उन्हाळ्याच्या कहरात, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची भीती आहे, ज्यामुळे वादळ आणि चक्रीवादळ देखील येऊ शकते.
भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे पर्यंत हे वादळ बंगालच्या उपसागरात धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताशी १०२ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. वादळामुळे, हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात २६ मे पर्यंत आणि त्याच्या उत्तरेकडील नागरिकांना २४ ते २७ मे दरम्यान सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
IMD ने २५ ते २७ मे दरम्यान अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामध्ये मिझोरम, पश्चिम बंगाल, उत्तर ओरिसा, दक्षिण मणिपूर आणि इतर अनेक राज्यांचा समावेश आहे. त्यानुसार, यावर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान भारतीय मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. तसेच, जून ते सप्टेंबर दरम्यान देशाच्या पश्चिम भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.