Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघाताबाबत दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना नवीन जबाब दिला आहे. अपघातादरम्यान कार मुलगा नाही तर फॅमिली ड्रायव्हर चालवत होता, असा दावा विशाल अग्रवाल यांनी केला आहे. यानंतर आता या अपघातप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी माहिती दिली आहे.
आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे. अमितेश कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपीचे ब्लड रिपोर्ट मिळालेले नाहीयेत. तसेच आरोपीला काही विशेष सुविधा देण्यात आली किंवा त्याला काही खाद्यपदार्थ देण्यात आले याबाबतचे पुरावे मिळालेले नाहीयेत. त्यामुळे आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत.
आम्ही कायदेशीर मार्गाने जात आहोत. मात्र, आमच्यावर कोणाता दबाव आहे असं म्हणणं योग्य नाही. या प्रकरणात पोलीस सुरूवातीपासूनच बारकाईने काम करत आहेत, असं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं.
पुढे आयुक्तांनी सांगितलं की, दारूमुळे आरोपीला काहीच समजत नव्हतं अशी परिस्थिती नव्हती. आरोपी हा पूर्ण शुद्धीत होता हा आमचा युक्तीवाद आहे. कारण सकाळी 9 वाजता आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. तसेच आम्हाला सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून आमचा तपास सुरू आहे.
तसेच काही काळाने ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला हे खरं आहे. सुरूवातीला ड्रायव्हरने म्हटलं होतं की त्यानेच कार चालवली होती. त्यामुळे त्याने हे कोणाच्या दबावामुळे म्हटलं आहे याचा देखील तपास सुरू आहे, असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.