Kedarnath : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे. केदारनाथ धाममध्ये प्रवाशांनी भरलेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. क्रिस्टलच्या हेलिकॉप्टरचे रडर खराब झाल्याची माहिती मिळाली आहे. तर हेलिकॉप्टर पायलटच्या सावधानतेमुळे हा अपघात टळला आहे.
या घटनेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, आज (24 मे) सकाळी ७ वाजता क्रेटन एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर सहा प्रवाशांना घेऊन केदारनाथसाठी निघाले होते. यावेळी तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचे केदारनाथ हेलिपॅडच्या 100 मीटर आधी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
पायलटने सावधानता दाखवत हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग केले. हेलिकॉप्टर सुखरूप उतरल्यानंतर यात्रेकरूंनी सुटकेचा नि:श्वास सोडला. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर सेवा नेहमीच जोखमीची राहिली आहे. केदारनाथमध्ये गेल्या 11 वर्षांत 10 अपघात झाले आहेत.
पायलट कल्पेश यांनी शहाणपणा दाखवत आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित लँडिंग केले, ज्यामध्ये सर्व भाविक सुरक्षित आहेत. घटनेदरम्यान पोलीस व प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन प्रवाशांना मदत करत मंदिरात नेले.