पश्चिम बंगाल राज्य पुन्हा एकदा नंदीग्राम येथील भाजप महिला कार्यकर्त्याच्या हत्येमुळे चगरचेत आले आहे. संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाने देखील बंगालच्या सरकारला चांगले झापले आहे. तसेच त्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये बुधवारी रात्री भाजपच्या महिला कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी राज्यपाल डॉ. सीव्ही आनंदा बोस सक्रिय झाले आहेत. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारला पत्र लिहून या प्रकरणी तातडीने कारवाई करून कारवाईचा अहवाल राजभवनाला पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी वाहनांचे टायर जाळले, रस्ते अडवले, दुकाने बंद पाडत आपला निषेध व्यक्त केला आहे.
सोनाचुरा गावात भाजपच्या कार्यकर्ता राठीबाला अरी (३८) यांची तृणमूल समर्थित गुन्हेगारांनी हत्या केल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी हे आमदार असलेल्या नंदीग्राम जागेसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. हिंसाचारानंतर निदर्शने आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.