Dombivli MIDC Blast Case : डोंबिवलीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी आता नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कंपनीच्या मालकाला अटक केली आहे.
मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून त्यांना आज नाशिक पोलिसांनी मेहेरधाम परिसरातून ताब्यात घेतले आहे. तसेच कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याप्रकरणी पोलिसांनी मालती मेहता आणि मलय मेहता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
काल झालेल्या स्फोटानंतर अमुदान कंपनीचे मालक फरार झाले होते. तर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत मालक मालती मेहता यांचे लोकेशन ट्रेस केले आणि त्यांचा शोध घेतला. काल रात्री नाशिक क्राईम ब्रांच युनिट आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत कंपनीच्या मालक मालती मेहता यांना अटक केली आहे.
दरम्यान, केमिकल कंपनीत झालेल्या या भीषण स्फोटात मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. तर या घटनेत अनेक जण जखमी देखील झाले आहेत. तसेच मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून घटनास्थळी अद्यापही शोध मोहीम सुरू आहे.