Laila Khan Murder Case : तब्बल 13 वर्षांनंतर अभिनेत्री लैला खानला न्यान मिळाला आहे. लैला खान आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करणाऱ्या सावत्र पित्याला मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने परवेझ टाकला लैला, तिची आई आणि चार भावंडांची हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. ही घटना 13 वर्षे जुनी आहे. सावत्र वडिलांनी लैला, तिची आई आणि चार भावंडांची हत्या केली होती, त्यानंतर त्यांनी फार्म हाऊसमध्ये खड्डा खणून मृतदेह पुरले होते.
गेल्या आठवड्यात सरकारी वकील पंकज चव्हाण यांनी दोषी परवेझ टाकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. हा खून पूर्णपणे नियोजित होता, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लैला खान हत्याकांडप्रकरणी मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी आरोपीचे वकील वहाब खान यांनी युक्तिवाद केला, ज्यामध्ये त्यांनी किमान जन्मठेपेची मागणी केली होती. इतकेच नाही तर दोषीच्या वकिलाने टाकच्या तुरुंगातील चांगल्या वागणुकीकडे लक्ष वेधले आणि तो सुधारला असल्याचे सांगितले आणि त्यामुळे शिक्षा कमी करण्यासाठी हा आधार असल्याचे नमूद केले. मात्र, न्यायालयाने त्यांचे म्हणणे न ऐकता परवेझ टाकला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
परवेझ टाक हे लैलाचे सावत्र वडील आहेत. परवेझने लैलाच्या आईसोबत तिसरे लग्न केले होते. फेब्रुवारी 2011 मध्ये लैला खान, तिची आई आणि चार भावंडांची महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील बंगल्यात हत्या करण्यात आली होती. वृत्तांवर विश्वास ठेवला तर मालमत्तेवरून झालेल्या वादातून परवेझने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.