छत्तीसगडच्या बस्तरमधील अबुझमद भागातील ओरछा पोलीस ठाण्याच्या रेकावाही जंगलात गुरुवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ८ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सात शस्त्रेही जप्त केली आहेत. नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळावरून सापडलेल्या शस्त्रांमध्ये आधुनिक शस्त्रेही होती. याशिवाय या चकमकीत १२ नक्षलवादी जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, नारायणपूर आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमा भागात कॉम्बॅट बटालियन प्लाटून क्रमांक १६ चे कमांडर मल्लेश आणि इंद्रावती एरिया कमिटीचे अनेक नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती. माहितीनुसार, नारायणपूर, दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यांतील डीआरजी आणि बस्तरच्या सैनिकांसह एसटीएफच्या पथकांनी शोध मोहिमेला सुरुवात केली होती. यादरम्यान संयुक्त आघाडी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. अबुझमद परिसरातील ओरछा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकावाही जंगलात गुरुवारी पहाटे ते दुपारी उशिरापर्यंत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सात नक्षलवादी ठार केले. १२ नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. छत्तीसगडमध्ये सुरू असलेली सुरक्षा दलांमधील आणि नक्षलवाद्यांमधील चकमक झाली. या ऑपरेशमध्ये तब्बल १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.