लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. ५ व्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आज ६ व्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे. आज तब्बल ११.३ कोटींपेक्षा जास्त नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर एकूण ८८९ उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद होणार आहे. आज ६ व्या टप्प्यात एकूण ५८ जागांवर मतदान सुरु झाले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर ट्विट करत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ”निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी पुढे यावे. प्रत्येक मत मोजले जाते आणि आपले मत देखील तितकेच महत्वाचे आहे. निवडणूक प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग असेल तेव्हाच लोकशाही बहरते. माता, भगिनी आणि मुलींना तसेच तरुण मतदारांना माझे विशेष आवाहन आहे की त्यांनी मतदानाचा हक्क बजावावा.”
दरम्यान आजच्या ६ व्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील १४,हरियामध्ये १०, बिहारमध्ये ८, पश्चिम बंगालमध्ये ८, दिल्लीमध्ये ७ तर ओडिशामध्ये ६ जागांवर मतदान होत आहे. तसेच झरखंडमधील ४ आणि जम्मू काश्मीरमधील १ जागेवर आज मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या सहावा टप्पा पूर्ण झाल्यानंतर देशातील लोकसभेच्या ४८४ जागांवर मतदान पार पूर्ण होणार आहे. यानंतर १ जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात केवळ ५७ जागांवर निवडणूक होणार आहे. ४ जून रोजी सर्व टप्प्यातील मतमोजणी एकाच वेळी होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत.