सध्या राज्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रमुख धरणसाठ्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठा मोठ्या वेगाने कमी होत आहे. मात्र शिल्लक पाणीसाठा अधिकाधिक दिवस वापरात यावा म्हणून मुंबई महानगरात ३० मे पासून पाणीकपात करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. तसेच परिस्थिती पाहून पाणीकपात वाढवायची की तशीच ठेव्याची याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
३० मे पासून मुंबई महानगरात ५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच सर्वानी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात देखील भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे हजारपेक्षा जास्त टँकर्सच्या मदतीने गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे.