कल्याणीनगर अपघात प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाच्या आजोबांना म्हणजे सुरेंद्र अग्रवाल यांना न्यायालयाने २८ मे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकावर दबाव आणत त्याचे अपहरण करून त्याला अन्यायाने ताब्यात ठेवल्याबाबत मुलाच्या आजोबांना गुन्हे शाखेने आज सकाळच अटक केली आहे.गुन्हे शाखेकडून देखील सुरेंद्र अग्रवाल यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. .
सुरेंद्रकुमार अग्रवाल असे अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाच्या आजोबाचे नाव आहे. शनिवारी (ता. २५) सकाळी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यासह मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यावर देखील याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरेंद्र अग्रवाल यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर विशाल अग्रवाल हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
चालक गंगाराम पुजारी (वय ४२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण तीन गुन्हे दाखल झाले असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना दुपारी तीन वाजता सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी ड्रायव्हरच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पार्वती पुजारी यांची चौकशी होणार आहे. ड्रायव्हर गंगाराम यांना कोणी आणि कसे डांबुन ठेवले. याबद्दल अनेक पुरावे त्यांच्या पत्नीकडे असण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिसांनी ड्राईव्हरला देखील सुरक्षा पुरवली आहे.
सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर याआधी देखील वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.ते बांधकाम व्यावसायिक आहेत. गोळीबार प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अजय भोसले यांच्यावरील गोळीबार प्रकरणात ते सहआरोपी देखील आहेत. सुरेंद्र अग्रवाल यांचे छोटा राजनसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे.