लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे
देशभरात सर्वत्र प्रचार सभा घेत आहेत. नुकतेच त्यांनी हिमाचल प्रदेशच्या मंडी या
लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार सभा घेतली. भाजपाने मंडी येथून अभिनेत्री कंगना
रानौतला तिकीट दिले आहे. आज कंगन रानौतच्या प्रचारार्थ मोदींनी जनसमुदायाला
संबोधित केले. यावेळी त्यांनी देश तिसऱ्यांदा काँग्रेसला नाकारणार असल्याचे
सांगितले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने पाच टप्प्यातील निवडणुकीत बहुमतापेक्षा
जास्त जागा जिंकल्या आहेत. आता हिमाचलच्या चारही जागांवर विजय मिळवणे त्यात केवळ
भर घालण्यासाठी आहे. हिमाचल प्रदेशात आम्ही सर्व जागा जिंकणार आहोत, असे देखील प्रचारसभेत म्हणाले.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, ”अयोध्येतील भव्य राम मंदिर पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर उभारले गेले
आहे. दरम्यान, हिमाचल
प्रदेश ही राम मंदिराच्या निर्मितीसाठी संकल्पाची भूमी आहे. कारण १९८९ मध्ये
पालमपूरमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात घेतलेल्या निर्णयाने इतिहास
रचला आहे. पालमपूरमध्येच अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याचा ठराव घेण्यात आला
होता. जे आता तयार झाले आहे.”