Pune Porsche Accident : सध्या पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या रस्ते अपघाताची देशभर चर्चा होत आहे. येथे भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दारूच्या नशेत 17 वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता. याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.
शनिवारी (25 मे) अल्पवयीन मुलाच्या आजोबांना त्यांच्या कार चालकाचे अपहरण करणे, त्याला धमकावणे आणि चालकाला गुन्ह्याची कबुली देण्यास भाग पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याचबरोबर या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. आता ड्रायव्हरच्या पत्नीवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला जात आहे.
या प्रकरणात चालकाचे अपहरण करण्यापासून ते त्याला गुन्ह्याची कबुली देण्यास भाग पाडल्यापर्यंतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, चालकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अपघात झाल्यानंतर मुलाच्या वडिलांनी फोन केला. वडिलांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी तो कार चालवत होता, असा दावा त्याला करावा लागेल. तसेच अल्पवयीन मुलाची आईही भावूक झाली आणि अपघाताची जबाबदारी घेण्याची विनंती केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर अल्पवयीन मुलगा, त्याचे मित्र आणि चालकाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सुरुवातीला ड्रायव्हरने आपणच गाडी चालवत असल्याचा दावा केला होता. मात्र, पोलिसांनी या वक्तव्यावर विश्वास ठेवला नाही आणि अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला.
सीपी अमितेश कुमार यांनी सांगितले, 19 मे रोजी रात्री उशिरा अल्पवयीन मुलाचे वडील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ड्रायव्हर घरी जात असताना त्याचा पाठलाग केला. त्यांनी त्याला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवले आणि वडगावशेरी येथील त्यांच्या बंगल्यावर नेले. यावेळी चालकाला एका खोलीत बसण्यास भाग पाडले आणि त्याचा फोन काढून घेण्यात आला. त्याला भेटू दिले नाही. दुसऱ्या दिवशी चालकाची पत्नी पतीच्या शोधात बिल्डरच्या बंगल्यात गेली. पण तिलाही भेटू दिले नाही. बिल्डरच्या कुटुंबीयांनी तिला अनेक ‘वचने’ दिली आणि तिला तिच्या पतीला अपघाताची जबाबदारी घेण्यास पटवून देण्याची विनंती केली.
दुसऱ्या दिवशी ड्रायव्हरला चेतावणी देऊन घरी परतण्याची परवानगी देण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर तो दोन दिवस गायब होता आणि गुरुवारी पुन्हा एकदा दिसला. गुरुवारी आम्ही त्याला गुन्हे शाखेत चौकशीसाठी नेले असता, या प्रकरणातील बाबी समोर आल्या, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे.