Income Tax Department Raid In Nashik : नाशिकमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. मागील दोन दिवसांपासून नाशिकमधील सराफ व्यावसायिकांकडे आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर आणि त्याच्या निवासस्थानावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मागील 30 तासांपासून तपासणी सुरू आहे. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी तब्बल 26 कोटींची रोकड जप्त केली आहे.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून एकाच ज्वेलर्सच्या दोन दालनांमध्ये तपासणी सुरू होती. या छापेमारीत बंगल्यातील फर्निचर फोडून अधिकाऱ्यांनी नोटा बाहेर काढल्या आहेत.
नाशिकमधील सराफ आणि बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. अचानक झालेल्या या छापेमारीमध्ये सराफांचे आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. कर बुडवे व्यावसायिक हे मागील दोन दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी खासगी वाहनातून नाशिकमध्ये दाखल होत सराफ आणि व्यावसायिकांच्या घरांवर रेड टाकली. सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
या छाप्यात तब्बल 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची दस्तऐवज जप्त करण्यात आली आहे. आयकर चुकवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली होती.