Rajkot Gaming Zone Fire : मागील काही दिवसांपासून देशात आगीच्या घटना घडताना दिसत आहेत. डोंबिवलीतील केमिकल कंपनीत झालेल्या बॉयलर स्फोटची घटना ताजी असतानाचा आता गुजरातमधील राजकोटमध्ये एक आगीची घटना घडली आहे. गुजरातमधील राजकोटमधील गेम झोनमध्ये शनिवारी (25 मे) संध्याकाळी 5 वाजता भीषण आग लागली. या घटनेत 12 मुलांसह 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या आगीत मृतांचा आकडा वाढू शकतो असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी साडेचारच्या सुमारास गेमिंगसाठी बांधलेल्या फायबर डोममध्ये भीषण आग लागली. यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ततसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि वीकेंडमुळे गेम झोनमध्ये खूप गर्दी होती.
गेम झोनमध्ये अनेक ठिकाणी दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात प्लाय आणि लाकडाचे तुकडे पसरले होते. आग लागताच तेही त्यात अडकले आणि अवघ्या 30 सेकंदात आग संपूर्ण गेम झोनमध्ये पसरली. आगीत संपूर्ण गेम झोन जळून खाक झाला आहे.
या आगीच्या घटनेवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी महापालिका आणि प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ज्यांना फायर एनओसी नाही असे सर्व गेम झोन बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
दरम्यान, या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच सुमारे तीन तासांत या आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मृतांचे मृतदेह गंभीररित्या जळाले आहेत. त्यामुळे अद्याप ओळख पटू शकलेली नाही. ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.