PM Modi : गुजरातमधील राजकोटमध्ये एका गेम झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बेपत्ता आहे. या घटनेनं संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.
राजकोटमधील गेम झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली सापडलेल्या मृतदेहांची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांची ओळख पटवणेही कठीण होत आहे. मृतदेह ताब्यात देण्यासाठी प्रशासनाने कुटुंबीयांची डीएनए चाचणी सुरू केली आहे.
या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून राजकोटमधील आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी बोलून बचाव आणि मदत कार्याची माहिती घेतली आहे. त्यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिले की, “राजकोटमधील आगीच्या दुर्घटनेने आपल्या सर्वांना दुःखी केले आहे. काही काळापूर्वी एका दूरध्वनी संभाषणात, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल जी यांनी मला बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सांगितले आहे. या घटनेने मी अत्यंत व्यथित झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत.”
तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहे. तर स्थानिक प्रशासन जखमी लोकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.