IPL 2024 Final : आयपीएल 2024चा 17वा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज (26 मे) IPL 2024 चा अंतिम सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
आजच्या हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील सामन्याच्या दिवशी तेथील हवामान कसे असेल असा प्रश्न उपस्थित झाला होता. तर आज चेन्नईमध्ये वातावरण उष्म असेल. तर हवामान खात्याच्या म्हणण्यांनुसार, या काळात पावसाची शक्यता तीन टक्के असून, अंदाजानुसार पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता नाही. त्यामुळे हवामानाच्या अंदाजानुसार चाहत्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सामन्याचा आनंद घेता येणार आहे. मात्र, सामन्यादरम्यान संध्याकाळी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
आत्तापर्यंत चालू हंगामात एकूण तीन सामने पावसामुळे पूर्णपणे रद्द करावे लागले आहेत. तर एका सामन्यात पावसामुळे षटके कमी करण्यात आली होती. यामध्ये मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे 16-16 षटकांचा करण्यात आला होता, तर 13 मे रोजी कोलकाता आणि गुजरात यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता. तसेच हैदराबाद आणि गुजरात यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला होता. इतकंच नाही तर IPL 2024 च्या ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना KKR आणि राजस्थान यांच्यात रविवारी गुवाहाटीमध्ये खेळला गेला तो पावसामुळे खेळला जाऊ शकला नव्हता.
दरम्यान, आजची कोलकाता संघाची ही चौथी फायनल आहे तर सनरायझर्सची ही तिसरी फायनल आहे. KKR संघाने दोनदा (2012, 2014) विजेतेपद पटकावले आहे. तर SRH हा संघ 2016 मध्ये आयपीएल चॅम्पियन बनला होता. त्यामुळे आजच्या या सामन्यात कोण बाजी मारणार आणि आयपीएल चॅम्पियन बनणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.