Amit Shah : लोकसभा निवडणूकीत भाजप सत्तेत आल्यानंतर पक्षाची पुढील योजना काय असेल हे गृहमंत्री अमित शाह यांनी उघड केले आहे. अमित शाह यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भाजप सत्तेत परत आल्यास सर्व संबंधितांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर पुढील पाच वर्षांत संपूर्ण देशासाठी समान नागरी संहिता लागू केली जाईल.
यावेळी अमित शाह म्हणाले, देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची वेळ आल्याने मोदी सरकार पुढच्या काळात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी करेल. तसेच एकाचवेळी निवडणुका घेतल्याने खर्चही कमी होईल.
पुढे समान नागरी संहितेबद्दल बोलताना अमित शाह म्हणाले, UCC ही स्वातंत्र्यापासून आपल्या संविधान निर्मात्यांनी आपल्यावर, आपल्या संसदेवर आणि आपल्या देशाच्या विधानमंडळांवर सोडलेली जबाबदारी आहे. तसेच संविधान सभेने आपल्यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समान नागरी संहितेचा समावेश आहे. त्यावेळीही के.एम.मुन्शी, राजेंद्र बाबू, आंबेडकरजी यांसारख्या कायदेपंडितांनी धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारे कायदे नसावेत असे म्हटले होते. समान नागरी संहिता असावी. तसेच भाजपने उत्तराखंडमध्ये एक प्रयोग केला आहे जेथे त्यांचे बहुमत सरकार आहे कारण हा राज्य आणि केंद्राचा विषय आहे, असे अमित शाह म्हणाले.
माझा विश्वास आहे की समान नागरी संहिता ही एक मोठी सामाजिक, कायदेशीर आणि धार्मिक सुधारणा आहे. उत्तराखंड सरकारने केलेल्या कायद्याची सामाजिक आणि कायदेशीर छाननी झाली पाहिजे, असेही अमित शाह म्हणाले.