लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेले मतदान आता अखेरच्या टप्प्यात आले आहे. १ जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्याआधी भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आज ते पूर्वांचलच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देवरिया आणि बासगाव येथील सभांना संबोधित केले. यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार टीका केली आहे. सपा आपले कुटुंब वाचवण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबाची काळजी वाटते. इंडी आघाडीच्या लोकांनी व्होट बँकेसाठी राम मंदिर नाकारले. सपाचे लोक राम मंदिराला अपवित्र म्हणतात. त्यामुळे रामाला शिव्या देणाऱ्यांना पूर्वांचलमध्ये एकही जागा मिळाली नाही पाहिजे. इंडी आघाडी म्हणत आहे, आम्ही आलो तर जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ३७० लागू करू, ते CAA रद्द करतील. भारतविरोधी शक्तींनाही हेच हवे आहे, इंडी आघाडीवाल्याना पण हेच हवे आहे का?”
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले,” काँग्रेस आणि सपाचे तुष्टीकरण घातक आहे. अशा काही शक्ती आहेत ज्यांना भारताच्या प्रगतीमुळे पोटात दुखत आहे. या लोकांना ४ जून साठी वेगवेगळी स्वप्ने पडत आहेत. पाकिस्तानमध्ये सपा-काँग्रेसच्या इंडी आघाडीसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. सीमेपलीकडून जिहादी त्यांना साथ देत आहेत. येथे सपा-काँग्रेस जिहाद मतांसाठी आवाहन करत आहेत. त्यांचा मुद्दा देशाच्या विकासाचा नाही, त्यांना भारताला अनेक दशके मागे घेऊन जायचे आहे.”