राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आध्यात्मिक मूल्ये विकसित करण्याच्या गरजेवर भर देत म्हणाल्या की ,आध्यात्मिक सक्षमीकरण हेच खरे सशक्तीकरण आहे.. ते स्पष्ट करताना मुर्मू म्हणाल्या की, आध्यात्मिक मूल्ये सर्व धर्मातील लोकांना एकमेकांशी जोडतात. ब्रह्मा कुमारी संस्थानने नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज आयोजित केलेल्या ‘स्वच्छ आणि निरोगी समाजासाठी आध्यात्मिक सक्षमीकरण’ कार्यक्रमाच्या राष्ट्रीय शुभारंभप्रसंगी राष्ट्रपती उपस्थितांना संबोधित करत होत्या.
यावेळी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, जागतिक इतिहासातील सुवर्ण अध्याय आणि राष्ट्रांचा इतिहास नेहमीच आध्यात्मिक मूल्यांवर आधारित असतो. जगाचा इतिहास साक्षी आहे की अध्यात्मिक मूल्यांकडे दुर्लक्ष करून केवळ भौतिक प्रगतीचा मार्ग स्वीकारणे शेवटी विनाशकारी ठरले. निरोगी मानसिकतेच्या जोरावरच सर्वांगीण कल्याण शक्य आहे. तसेच , खऱ्या अर्थाने निरोगी व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही आयामांची पूर्तता करते. अशा व्यक्तीच निरोगी समाज, राष्ट्र आणि जागतिक समुदाय निर्माण करतात.
राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, आध्यात्मिक सबलीकरण हेच खरे सशक्तीकरण आहे. कोणत्याही धर्माचे किंवा पंथाचे अनुयायी जेव्हा अध्यात्माच्या मार्गापासून दूर जातात तेव्हा ते धर्मांधतेचे बळी होतात आणि अस्वस्थ मानसिकतेला बळी पडतात. आध्यात्मिक मूल्ये सर्व धर्मातील लोकांना एकमेकांशी जोडतात.
उलट स्वार्थाच्या वर उठून लोककल्याणाच्या भावनेने काम करणे ही आंतरिक अध्यात्माची सामाजिक अभिव्यक्ती आहे. सार्वजनिक कल्याणासाठी देणगी देणे हे सर्वात महत्त्वाचे आध्यात्मिक मूल्य आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, भीती, दहशत आणि युद्धाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्ती जगाच्या अनेक भागात सक्रिय आहेत. अशा वातावरणात ब्रह्मा कुमारी संस्थेने 100 हून अधिक देशांमध्ये अनेक केंद्रांच्या माध्यमातून मानवतेच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार करून जागतिक बंधुभाव दृढ करण्याचा हा अमूल्य प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रह्मा कुमारी संस्था ही महिला चालवणारी जगातील सर्वात मोठी आध्यात्मिक संस्था आहे असे सांगत राष्ट्रपती मुर्मूनी या संस्थेचे कौतुक केले. अनोख्या समरसतेने ही संस्था सातत्याने पुढे जात आहे. हे करून या संस्थेने अध्यात्मिक प्रगती आणि महिला सक्षमीकरणाचे अनोखे उदाहरण जागतिक समुदायासमोर मांडले आहे.