अमुदान कंपनीत रासायनिक स्फोट झाल्यानंतर सोमवरी पाचव्या दिवशी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी घटना स्थळी येऊन पाहणी केली आहे. मंत्री सुरेश खाडे यांचा सोबत संबंधित खात्याचे अधिकारीही होते. शासन कामगारांना सर्वोतोपरी मदत करेल असे यावेळी आश्वासन दिले.
मंत्री खाडे यानी स्फोट झाला त्या औद्योगिक विभागातील फेज 2 मधील अमुदान कंपनीत परिसराची प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी कामगार मंत्री खाडे म्हणाले, स्फोटातील पीडितांना शासन सर्वतोपरी मदत करेल, तसेच दोषीवर कारवाई होईल.दरम्यान काम करीत असताना कंपनी नियमांचे उल्लंघन करून कोणी जर नियमाचे पालन करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल. सत्य काय ते समोर येईलच.कामगारांच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील ते ही सोडविण्यासाठी शासन कमी पडणार नाही.कुशल – अकुशल कामगार बाबतीचे धोरण पाहिले जाईल.आमच्या माहितीनुसार संबंधित कंपनीचे सेफ्टी ऑडिट झाले होते. तसा प्रत्येक वर्षांचा अहवाल तपासला जाईल. कंपनी मालकावर फौजदारी कारवाई केली असून त्याला अटकही केली आहे. कामगारांचे नुकसान होणार नाही याची शासनाने सर्वतोपरी जबाबदारी घेतली आहे.
कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी डोंबिवलीत अमुदान प्रा. लि. केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाची पाहणी केली. तसेच बाजूच्या इतर परिसराची पाहणी करतांना संबंधीत अधिकाऱ्यांकडून कंपनीच्या कारभाराची माहिती घेतली. स्फोटासंदर्भात आढावा बैठकही घेतली. यावेळी प्रधान सचिव (कामगार), कामगार आयुक्त, मुंबई, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य अधिकारी उपस्थित होते. डोंबिवलीतील खाजगी एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन घटनेतील उपचार घेत असलेल्या जखमी कामगारांची विचारपूस करून त्यांना आधार दिला. मात्र खाडे हे कल्याण- अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कार्यालयात येणार होते पण त्यांनी आपला दौरा आटोपता घेत थेट मुंबई गाठली.