प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी वेक्टर (३७) याची लॉस एंजेलिसमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तसेच त्याच्या झालेल्या हत्येने हॉलिवूड चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. जॉनी वेक्टरच्या चाहत्यांनाही धक्का बसला असून ते सोशल मीडियावरून शोक व्यक्त करत आहेत.
शनिवारी 25 मे रोजी लॉस एंजेलिसमध्ये ही घटना घडली. जॉनी वेक्टर याची आई स्कारलेट हिने सांगितले की, पहाटे ३ वाजता हा हल्ला झाला. त्याच्या कारमधून कन्व्हर्टर चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी अभिनेता जॉनी वेक्टरला गोळी झाडली, जॉनी वेक्टरने त्यांना थांबवण्याचा किंवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही. तरीही त्याची हत्या करण्यात आली. जॉनीची आई स्कारलेट यांनी सांगितले की, या घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जॉनी वेक्टरने 2007 मध्ये आर्मी वाइव्हज या शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तो अनेक शोमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला. जॉनी ‘जनरल हॉस्पिटल’मधील ब्रँडो कॉर्बिनच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. २०० हून अधिक एपिसोड असलेल्या या शोमध्ये जॉनीने ड्रग ॲडिक्ट साशाच्या पतीची भूमिका साकारली होती. २०२२ मध्ये त्याने हा शो सोडला होता. दरम्यान ‘जनरल हॉस्पिटल’ च्या टीमनेही पोस्ट करून जॉनीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘जनरल हॉस्पिटल’ व्यतिरिक्त तो ‘स्टेशन १९’, ‘वेस्टवर्ल्ड’ आणि ‘कॉल ऑफ ड्यूटी: व्हॅनगार्ड’मध्ये देखील दिसला होता.