इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान हमासने पुन्हा एकदा तेल अवीववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल चार महिन्यांनंतर हमासने रविवारी इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. तेल अवीवसह अनेक इस्रायली शहरांमध्ये सायरन वाजवण्यात आले आणि गाझामधील रफाह येथून हमासच्या हल्ल्यामुळे लोकांना बाहेर काढण्याचा इशारा देण्यात आला. इस्रायलवरील हल्ल्यात हमासने लांब पल्ल्याच्या रॉकेटचा वापर केला होता. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मोठी हानी झाल्याची सध्या कोणतीही माहिती नाही. इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, गाझा येथून आठ रॉकेट सोडण्यात आले होते, त्यापैकी बहुतांश रॉकेट हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केले.
हमासची सशस्त्र शाखा, अल-कासम ब्रिगेड्सने सांगितले की त्यांनी रविवारी तेल अवीववर “मोठा क्षेपणास्त्र” हल्ला केला. इस्त्रायली सैन्याने शहरात सायरन वाजवून संभाव्य रॉकेटचा इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. इस्रायली आपत्कालीन वैद्यकीय सेवांनी सांगितले की त्यांना कोणत्याही जीवितहानीचे कोणतेही वृत्त मिळाले नाही.
गाझामध्ये इस्रायली सैन्य आणि पॅलेस्टिनी सैनिकांमध्ये झालेल्या या लढाईत आतापर्यंत सुमारे 36 हजार पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. हमासने दावा केला आहे की, जबलियामध्ये आपल्या सैनिकांनी इस्रायली सैनिकांना पकडले आहे, मात्र इस्रायली लष्कराने हमासचा हा दावा फेटाळून लावला आहे. हमासने किती सैनिक पकडले हे सांगितले नाही आणि आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत.
हमासचे प्रवक्ते अबू उबैदा म्हणाले की, लढवय्यांनी एका बोगद्यात इस्रायली सैनिकांवर हल्ला केला. हे सैनिक हमासच्या सैनिकांच्या शोधात बोगद्यात घुसले होते. दरम्यान, इजिप्तने पुन्हा वेगळ्या मार्गाने गाझाला मदत सामग्रीने भरलेले ट्रक पाठवण्यास सुरुवात केली आहे.