(जन्म- तेरावे शतक, मेव्हुनपुरी-बुलढाणा, मृत्यू- ई.स.१३३८ मंगळवेढा)
(आई- सावित्री, वडील- सुदामा)
▪️ संत प्रभावळीतले प्राचीन मराठी साहित्यातले प्रतिभासंपन्न कवी म्हणून ओळखले जाणारे संत चोखामेळा. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा गावचे. जन्म बुलढाणा जिल्ह्यातला. पत्नी सोयराबाई सुद्धा विठ्ठलभक्त. चोखामेळा प्रापंचिक गृहस्थ होते. यादव काळातले संत नामदेवांचे शिष्य. सामाजिक विषमता .भेदाभेद, वर्ण व्यवस्था यात होरपळून निघलेले चोखोबा पांडुरंगाचे निस्सीम भक्त.
▪️लहानपणापासूनच त्यांना परमेश्वर भक्तीची गोडी लागली होती. मंगळवेढ्याहून पंढरीला जाणारे वारकरी पाहिले की त्यांचे मन आनंदत असे. कोणीही विठ्ठल भक्त दिसला तरी त्यांना परमावधीचा आनंद होई.संत ज्ञांनेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज व भक्तांच्या अनेक गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या तेंव्हाच त्यांची इच्छा होती की, या थोर विभूतींना आपण भेटावे,
कोणी पंढरिसी जाती वारकरी।
तयाचे पायांवरी भाळ माझे।।
आनंदे तयांसी भेटेन आवडी।
अंतरीची गोडी घेईन सुख।।
ते माझे मायबाप सोयरे सज्जन।
तयांवरी तनुमन ओवाळीन।।
▪️विठ्ठल नामात सतत दंग असणाऱ्या , संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात सामाजिक वेदना मांडून भक्तीचा आशावाद सांगितला आहे, ते म्हणतात, मंदिरात बंदिस्त असला तरी मंदिराच्या पायरीशी उभे राहून, त्या सख्या पांडुरंगाशी आमचा मुक्तपणे संवाद होणारच, दु:खाच्या वाळवंटात आम्ही भक्तीचा मळा फुलवू आणि परमात्म्याशी एकरूप होऊ. समाजामुळे त्यांना त्रास झाला तरी त्यांनी कोणाला दोष दिला नाही. आपले हे सर्व भोग आहेत असेच त्यांना वाटे. त्या विषयी चोखोबांनी आत्मनिवेदनात म्हटलं आहे,
शुद्ध चोखामेळा, करी नामाचा सोहळा।।।
जातीहीन मी महार पुर्वी निळाचा अवतार।।
कृष्ण निंदा घडली होती म्हणूणी महार जन्म प्राप्ती।।
चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे फळ।।
▪️वर्ण व्यवस्थेमुळे क्षुद्र आणि स्त्रिया यांच्यावर अनेक बंधने होती. पण याचवेळी भागवत धर्माच्या स्थापनेमुळे आणि जनजागृतीमुळे सर्व लोकांना भक्तिमार्ग खुला झाला. याच काळात (तारीख उपलब्ध नाही)चोखोबांचा जन्म झाला. उच्च वर्णीयांसारखे राहण्याचा प्रयत्न केला म्हणून स्वत:च्याच समाजाकडून त्यांना त्रास झाला . शेवटी अत्यंत निराश होऊन विठ्ठल भक्तीकडे ओढले गेले.
▪️या भक्तीतून त्यांनी आपले मोठेपण सिद्ध केले.त्यांची पत्नी सोयराबाई, लहान बहीण निर्मळा, मेव्हणे बंका आणि मुलगा कर्ममेळा सगळेच जण नित्यनेमाने पांडुरंग भक्ति करत असत. निर्मळा सुद्धा समाज प्रबोधन करण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या. त्या चोखोबांना गुरु मानत. नामसाधनेचा सोपा मार्ग आपल्याला चोखोबांनीच सांगितला असं त्या म्हणतात.
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे