पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा रंगतदार लढत झाली आहे. कारण भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे रिंगणात होते, तर त्यांच्याविरोधात काँग्रेसने कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने या निवडणुकीत नेमकं कोण विजयी होणार, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे.
अशातच मतमोजणीला अवघे काही दिवस बाकी असताना मुरलीधर मोहोळ यांनी एका मुलाखतीदरम्यान आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत मताधिक्याविषयी देखील भाष्य केले आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “पुणे लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित आहे. कारण लोकांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान केले आहे. मला सर्वाधिक मताधिक्य कोथरूड विधानसभेतून मिळेल. पण कसब्यातूनही मला मताधिक्य मिळेल, हे मी नक्कीच सांगू शकतो.
पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये मला मताधिक्य असेल आणि ४ जूनला हे स्पष्टच होईल,” असे मोहोळ म्हणाले आहेत. तसेच एकूण किती मतांनी विजय होईल, या प्रश्नावर बोलताना मोहोळ यांनी सांगितले आहे की , “गिरीश बापटसाहेब यांना जेवढे मताधिक्य मिळाले होते , तेवढेच मताधिक्य मला पुणेकर देणार आहेत याची मला खात्री आहे”.