बंगालच्या उपसागरात ‘रेमल’ चक्रीवादळ धडकले आहे. या संदर्भात रविवारी
बंगालमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला होता. तर या चक्रिवादळामुळे कोलकाता
विमानतळ बंद करण्यात आले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने
आज सकाळी सांगितले की चक्रीवादळ दक्षिण २४ परगणामधील सागरद्वीप आणि बांगलादेशच्या
खेउप्पारा कोस्ट दरम्यान धडकले. त्यावेळी त्याचा वेग ताशी ११० ते १२० किलोमीटर
होता. त्याच्या प्रभावामुळे रात्रभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. उत्तर आणि
दक्षिण २४ परगणा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, हावडा, हुगळी आणि
कोलकाता या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. आजही मुसळधार पाऊस आणि
जोरदार वाऱ्यांबाबत विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय
म्हणून बंगालमधील रेल्वे आणि हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे.
चक्रीवादळ जमिनीवर येण्यापूर्वीच १ लाख
१७ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
कोलकातामध्ये चक्रीवादळाच्या वेळी घराची बाल्कनी डोक्यावर पडल्याने एका व्यक्तीचा
मृत्यू झाला आहे. सध्या राज्याच्या इतर कोणत्याही भागातून जीवितहानी झाल्याचे
वृत्त नाही. सोमवारी दुपारपर्यंत नुकसान किती झाले याचा अंदाज येईल, असे
राज्याच्या व्यवस्थापन विभागाचे म्हणणे आहे. लोकांच्या सोयीसाठी राज्य सचिवालय,
राज्य
पोलीस मुख्यालय, लाल बाजार आणि राजभवन कोलकाता येथेही नियंत्रण कक्ष उघडण्यात आले
आहेत.