दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
यां २१ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर अनेक दिवस ते कोठडीत होते. त्यांनी
निवडणुकीसाठी केलेला जामीन अर्ज कोर्टाने मंजूर करून त्यांना जामीन दिला होता.
तसेच २ जून रोजी पुन्हा सरेंडर होण्यासाठी सूचना देण्यात आली होती. मात्र आता
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक आठवडा जामीन वाढवून मिळावा यासाठी
सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. गंभीर आजार असल्याने काही तपासण्या
करायच्या आहेत, यासाठी अंतरिम जामीन वाढून द्यावा अशी विनंती केजरीवालांनी कोर्टाला
केली आहे.
१० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत
अंतरिम जामीन दिला होता आणि २ जून रोजी शरण येण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती
संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले होते की,
केजरीवाल
हे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत. निःसंशयपणे त्याच्यावर
गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र ते दोषी ठरवण्यात आलेले नाही. त्यांचा कोणताही
गुन्हेगारी इतिहास नाही. केजरीवाल यांचा समाजाला धोका नाही.
सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना
५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.
यापूर्वी २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेपासून
संरक्षण न दिल्यानंतर, ईडीने त्यांच्या चौकशीनंतर त्याच दिवशी संध्याकाळी उशिरा केजरीवाल
यांना अटक केली होती.