CM Yogi Adityanath : लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पक्ष मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवेल, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर आज तकच्या एका मुलाखतीत सीएम योगींनी यावर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. मी योगी आहे, सत्तेसाठी नाही तर पक्षाच्या मूल्यांसाठी आणि तत्त्वांसाठी काम करण्याला माझे प्राधान्य आहे, असे यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले.
यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, भाजप 400 पार करणार हा विश्वास नसून ते व्हायलाच हवे. हा संपूर्ण देशाचा मंत्र बनला आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, देशातील प्रत्येक वर्गाने, प्रत्येक समुदायाने हा नारा आपल्या जीवनाचा भाग बनवला आहे. मोदीजींची लोकप्रियता, त्यांनी गेल्या 10 वर्षात केलेले कार्य हे सर्व लक्षात घेऊन जनता या 400 पारच्या घोषणेला सत्यात उतरवत आहे.
4 जूनला निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा मोदी सरकार आणि एनडीएसोबत 400 पारचे आम्ही लक्ष्य गाठू, असा विश्वास सीएम योगींनी व्यक्त केला. तसेच निवडणुकीनंतर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या विरोधकांच्या दाव्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा राहिलेला नाही. ते आपसात फूट पाडण्याचे राजकारण करत आहेत. असो त्यांच्यात नेहमीच फूट पडली आहे. आधी काँग्रेसने देशाची फाळणी केली, नंतर प्रदेश, भाषेच्या आधारे फाळणी केली आणि या निवडणुकीत त्यांनी जातीच्या आधारे विभाजन करून अनेक प्रकारचा अपप्रचार केला आहे, अशी टीका योगींनी केली.
पुढे ते म्हणाले, हा विरोधकांचा अपप्रचार आहे. पण, मी देखील योगी आहे आणि माझ्यासाठी ती सत्ता नसून पक्षाची मूल्ये आणि तत्त्वे, ज्या मूल्यांसाठी आणि आदर्शांसाठी आपण राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात आलो आहोत, त्यासाठी काम करणे ही आपली प्राथमिकता आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.