Pune Accident : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती. एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या या अपघातात एका तरूणाचा आणि तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाता प्रकरणी अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे वडील विशाल अग्रवालला अटक करण्यात आली आहे. या अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यात आणखी एक मोठा अपघात घडला आहे. एका भरधाव ट्रकने तिघांना उडवल्याची घटना घडली आहे.
वाघोली येथे हा अपघात घडला आहे. वाघोलीतून पुण्याच्या दिशेने एक मालवाहतूक करणारा ट्रक येत होता. त्यादरम्यान जकात नाका चौकातील सिग्नलवर एका दुचाकीवर तीन तरूण थांबले होते. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने या तिघांना जोरात धडक दिली. या धडकेत तिघेही फरफटत गेले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
सोमवारी (27 मे) रात्री 10.30 वाजता हा अपघात घडला आहे. हे तिन्ही महाविद्यालयीन तरूण मूळचे लातूरचे आहेत. ते वाघोलीतील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तर आता या अपघात प्रकरणी ट्रक चालक श्यामबाबू रामफळ गौतम याला पोलिसांनी अटक केली आहे.
या अपघातानंतर तातडीनं विमाननगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी तरूणांना रूग्णालयात दाखल केलं. मात्र, तिघांपैकी एका घटनास्थळावरच मृत्यू झाला होता तर दुसऱ्या तरूणाचा रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. सध्या तिसऱ्या तरूणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.