दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) बनावट कागद पत्रांसह पिंपरी चिंचवडमधून 5 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.जे बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे. ही कारवाई भोसरी भागातील शांतीनगर परिसरात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार ,वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा, आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर या पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. तसेच त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना किंवा वैध कागदपत्र नसताना पिंपरी चिंचवड येथे राहत होते. बेकायदेशीररित्या भारतात बनावट आधार कार्ड, जन्माचा दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट अशी बनावट कागदपत्रे त्यांच्याकडे सापडली आहेत.दहशतवादी विरोधी पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून पाचही नागरिकांना अटक केली आहे.
आतापर्यंत आरोपींकडून पोलिसांनी सिम कार्ड, अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल, एअरटेल कंपनीचे सिम आदी साहित्य जप्त केले आहे. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा पारपत्र अधिनियम आणि भारतात प्रवेश करण्याचा नियम यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. तसेच बांगलादेशचे हे घुसखोर कोणत्या हेतूने पिंपरी चिंचवडमध्ये राहत होते, त्यांचा कुठलाही वाईट हेतू तर नव्हता ना? या दृष्टीनेदेखील तपास केला जाणार आहे.