Supriya Sule On Pune Porsche Accident : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या प्रकरणी दररोज नवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. तर सध्या या अपघाताच्या तापासामध्ये पुण्यातील ससून रूग्णालयाचे नाव देखील समोर आले आहे. तर या प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी ससून रूग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली आहे.
सुप्रिया सुळेंनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “पुणे जिल्हा आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात ससून रुग्णालयाने सिंहाचा वाटा उचलला आहे. परंतु गेली काही दिवसांपासून या रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. तर आता कल्याणीनगर ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणी दोन वरीष्ठ डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असून दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हायला हवे.”
“वास्तविक पाहता ससून रुग्णालय हे उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी ओळखले जाते. कोरोना काळात देखील येथे उत्तम सेवा उपलब्ध झाली होती. ससूनमध्ये तज्ज्ञ, अभ्यासू आणि अनुभवी डॉक्टर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे उपचार गरजू व गरीब रुग्णांना मिळतात. याखेरीज परिचारिका व सपोर्टींग स्टाफचे देखील सहकार्य लाभते.शिवाय अनेक नामांकित डॉक्टर येथून शिकून गेले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमानंतर आणि डॉक्टरांच्या अटकेनंतर त्यांच्यावर देखील शंका घेतली जात आहे. काही लोकांनी गैरकृत्य केले असेल तर त्यामुळे इतरांकडेही संशयाने पाहिले जाणे योग्य नाही”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, “रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही. म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समिक्षा होणे आवश्यक आहे. माझी शासनाकडे मागणी आहे की, आपण ससूनच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढून ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी”, अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.