Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तीस हजारी न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ केली आहे. हा निर्णय जाहीर होत असताना न्यायालयात मोठा गोंधळ झाल्याचीही बातमी आहे.
निकाल जाहीर होण्यापूर्वी सरकारी वकील न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये का बसले होते, असा प्रश्न बिभव कुमारच्या वकिलाने न्यायालयात उपस्थित केला होता, अशी माहिती समोर येत आहे. तर वकील तासभर त्यांच्या चेंबरमध्ये काय करत होते आणि आत्ताच म्हणजेच कोर्टात निर्णयाच्या वेळी बाहेर का आले, असा सवालही त्यांनी न्यायाधीशांना केला आहे.
सोमवारी (27 मे) तीस हजारी न्यायालयात स्वाती मालीवाल आणि बिभव कुमार यांच्या वकिलांमध्ये बरीच उलटतपासणी झाली होती. स्वाती मालीवाल यांनी दिल्ली न्यायालयात बिभवच्या जामीनाला विरोध केला आणि बिभवला जामीन मिळाल्यास त्यांचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे सांगितले. तर बिभव कुमारच्या वकिलांनी सांगितले की, स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात बळजबरीने प्रवेश केला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
बिभव कुमारच्या वकिलांनी सांगितले की, स्वाती मालीवाल त्या दिवशी न विचारता प्रवेश करू असा विचार करून आल्या होत्या. राज्यसभा खासदार असण्याचा अर्थ असा होतो का की कोणीही परवानगीशिवाय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात प्रवेश करू शकतो आणि तोही सुरक्षा क्षेत्र ओलांडून? वकिलांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा कर्मचारी स्वातीला वारंवार विचारत होते की त्या बिभवशी बोलल्या आहेत का, कारण मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी बिभववर होती. वकिलाने सांगितले की, त्या दिवशी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्वातीला आरामात घरातून बाहेर काढले होते आणि फुटेजमध्येही ती आरामात निघताना दिसत होती.