CM Eknath Shinde : पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघात प्रकरणात आत्तापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे. तसेच या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. तर आता या प्रकरणी पुन्हा एक नवीन अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून अपघात प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली आहे. तसेच त्यांनी आयुक्तांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कितीही मोठा व्यक्ती असला आणि किती दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी अशा दबावाला बळी न पडता तपास करा. राज्य सरकार पोलिसांसोबत आहेत त्यामुळे योग्य ती कारवाई झाली पाहिजे. यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना केल्या आहेत.
तसेच या अपघातात जीव गेलेल्या दोन्ही मुलांच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे. यासाठी कोर्टात केस कशी टिकेल अशा पद्धतीने तपास करा, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या आहेत. तसेच ते लवकरच पुण्याला जाण्याची शक्यता देखील आहे.