Loksabha Election 2024 : 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (29 मे) सकाळी 11 वाजल्यापासून पश्चिम बंगालमधील मथुरापूर येथे रॅलीला संबोधित करणार आहेत. यानंतर ते ओडिशाला रवाना होणार आहेत. तसेच दुपारी 1 वाजल्यापासून पंतप्रधानांची मयूरभंज, ओडिशात निवडणूक रॅली होणार आहे. यानंतर दुपारी 2.30 वाजता बालासोरमध्ये त्यांची निवडणूक प्रचारसभा होणार आहे. तर ओडिशातील केंद्रपारा येथे दुपारी 4.30 वाजता भाजपची रॅली होणार आहे.
दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. अमित शाह चार जाहीर सभा आणि रोड शो घेणार आहेत. महाराजगंज, देवरिया, बलिया आणि रॉबर्टसगंज या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या जाहीर सभा होणार आहेत. यासोबतच शाह गाझीपूरमध्येही रोड शो करणार आहेत.
अमित शाह यांच्यासोबत भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा झारखंड आणि पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. जेपी नड्डा हे झारखंडच्या देवघरमधून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. दुपारी 12.40 वाजता जाहीर सभेनंतर नड्डा देवघरमध्येच रोड शो करणार आहेत. यानंतर नड्डा दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात रोड शो करणार आहेत.