Prakash Ambedkar On Vishal Agarwal : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघाताने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या अपघात प्रकरणावरून संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणातील आरोपींना कठोरात कोठर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सध्या पुणे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तर या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांनी उडी घेतली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी खळबळजनक दावे केले आहेत. यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे.
अपघात प्रकरणावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “जोपर्यंत बेदकारपणे वाहन चालवण्यासंदर्भात नवा कायदा होत नाही तोपर्यंत अशी प्रकरणं घडत राहतील. ही एक नसून अशा अनेक केस आहेत. या प्रकरणात वाहनचालकाचा निष्काळजीपणा आहे त्यामुळे त्याला कुठेतरी कडक शिक्षा केली पाहिजे. यासाठी कडक कायदा येणे आवश्यक आहे. मग अल्पवयीन असो की प्रौढ यासंदर्भात जोपर्यंत कडक कायदा येत नाही तोपर्यंत या प्रकाराला आळा बसणार नाही.”
पुढे प्रकाश आंबेडकर यांनी विशाल अग्रवालवर निशाणा साधला. “या प्रकरणात विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला आहे? अग्रवालसोबत बांधकाम व्यावसायामध्ये कोणाची भागिदारी आहे? याचा खुलासा झाला तर त्याला वाचवणारी सर्व नावे समोर येतील”, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.